भाजप सुरेशदादा जैन यांचा वारसा चालवणार का?

जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच आता राजकीय वर्तुळात महापौर पदाच्या आरक्षणाची आणि कार्यकाळाची चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः भाजपच्या गोटात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रुजवलेला ‘सहा महिन्यांचा महापौर’ फॉर्म्युला पुन्हा चर्चेत आला असून, भाजप या ऐतिहासिक पॅटर्नची पुनरावृत्ती करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगावच्या राजकारणात सुरेशदादा जैन आणि त्यांनी स्थापन केलेली खानदेश विकास आघाडी (खाविआ) यांचे एकहाती वर्चस्व होते. सत्ता टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दादांनी एका अनोख्या पद्धतीचा अवलंब केला होता. ५ वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी निश्चित केला होता. यामुळे जळगावात ‘माजी महापौरांची’ मोठी फळी तयार झाली होती.
भाजपसमोर पेच : ४६ शिलेदार आणि एक खुर्ची
सद्यस्थितीत जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने ४६ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे, सुरेशदादा जैन यांचे अनेक खंदे समर्थक आज भाजपमध्ये आहेत, तर काही शिवसेना (शिंदे गट) मध्ये आहेत. ४६ नगरसेवक असल्याने प्रत्येक प्रभागातील प्रबळ दावेदाराला महापौर पदाची आशा आहे.
आगामी पाच वर्षांत किती जणांना संधी मिळणार आणि दादांप्रमाणे भाजप ‘सहा महिन्यांचा फॉर्म्युला’ वापरून सर्वांना खुश ठेवणार का? हा मोठा प्रश्न आहे. महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे सर्वस्व आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. हे पद राखीव (SC/ST/OBC) प्रवर्गासाठी निघणार? की खुल्या (Open) प्रवर्गासाठी? या सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल.
जर पद खुल्या प्रवर्गासाठी निघाले, तर भाजपमधील इच्छुकांची गर्दी मोठी असेल, अशा वेळी सुरेशदादा जैन यांचा ‘खाविआ’ पॅटर्न राबवणे भाजपसाठी सोयीचे ठरू शकते.”पाच वर्षात किती महापौर होणार?” हा प्रश्न सध्या जळगावच्या गल्लीबोळातील चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.









