जळगाव जिल्हा परिषदेत आतापर्यंत 13 जणांचे निलंबन
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवारी (२१ जानेवारी) पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या सर्व दिव्यांग कर्मचारी आणि व्यक्तींच्या यु डी आय डी कार्डाची तपासणी केली जात आहे. जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वीच ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. बुधवारी झालेल्या नवीन ५ कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर, आतापर्यंत कारवाई झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
निलंबित करण्यात आलेले कर्मचारी
तपासणी दरम्यान निकषानुसार दिव्यांगत्वाची टक्केवारी जुळत नसल्याने खालील कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे:
भास्कर रामदास चिमणकर – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती यावल.
विनोद शांताराम बोधरे – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती चोपडा.
शांताराम उखरडू तायडे – वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती यावल.
दिनेश लक्ष्मण नन्नवरे – कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग.
पारसमणी काशीराम मोर – कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती अमळनेर.
तपासणी मोहीम तीव्र
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची कसून पडताळणी केली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रात त्रुटी किंवा टक्केवारीत तफावत आढळत आहे, अशा सर्वांविरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.








