यावल पोलिसांत ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी): मृताना जिवंत दाखवून आणि बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ११ कोटी १५ लाख रुपये किमतीची ३ हेक्टर १९ आर (सुमारे सव्वा सात एकर) शेतजमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकारणी यावल पोलीस ठाण्यात मुख्य सूत्रधारासह ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कांचन संजय खत्री (वय ५२, रा. जालना) यांचे काका गेलाराम भुरामल (रा. जालना) यांच्या मालकीची मौजे बोरवल खुर्द (ता. यावल) येथे गट क्रमांक १९३ मध्ये ३ हेक्टर १९ आर जमीन होती. गेलाराम भुरामल यांचा मृत्यू १ जानेवारी १९९५ रोजीच झाला होता. मात्र, आरोपींनी संगनमत करून ही जमीन बळकावण्याचा कट रचला. मुख्य आरोपी अजित तुळशीराम भंडारी (रा. अंबरनाथ) याने संशयित आरोपी क्र. २ शाम मनोहर मुंदडा याला मृत ‘गेलाराम भुरामल’ म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. आरोपींनी गेलाराम भुरामल यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले आणि ते खरे असल्याचे भासवले. १६ जानेवारी २०२३ रोजी या बनावट व्यक्तीच्या माध्यमातून ११ कोटी १५ लाख रुपयांचा बनावट खरेदीखत दस्त नोंदवण्यात आला.
यानंतर आरोपींनी संगनमत करून या जमिनीचे दोन भाग केले. ५ डिसेंबर २०२४ रोजी १ हेक्टर ४५ आर जमीन सकूबाई धनगर हिच्या नावावर, तर २ एप्रिल २०२५ रोजी उर्वरित १ हेक्टर ७४ आर जमीन प्रशांत वसंतराव पाटील याच्या नावावर करून देण्यात आली. या प्रकरणात अजित तुळशीराम भंडारी (अंबरनाथ), शाम मनोहर मुंदडा (वसई), सचिन हेमचंद्र राऊत (नवी मुंबई), उमेश चंद्रकांत कदम (विरार), सकूबाई धनगर, शांताराम धनगर, रवींद्र धनगर, ईश्वर यशवंत पाटील, दिलीप लक्ष्मण धनगर (सर्व रा. बोरवल खुर्द), प्रशांत वसंतराव पाटील आणि किशोर सुरेश माळी (रा. यावल) व इतर अशा एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी कांचन खत्री यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









