आदिवासी पौगंडावस्थेतील मुलींसाठी योग-ध्यान प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

मासिक रज:प्रवृत्तीच्या शारीरिक-मानसिक स्वास्थावर योगाचा सकारात्मक प्रभाव
जळगाव (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे “पौगंडावस्थेतील आदिवासी मुलींच्या शारीरिक व मानसिक स्वास्थावर योग व ध्यानाचा प्रभाव अभ्यासणे” या प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मासिक रज:प्रवृत्तीच्या स्वास्थासंदर्भातील योग प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप दि. १७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. समारोप कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विनोद पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सी.ए.डी.पी. प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक प्रा. किशोर विश्वकर्मा, डी.एस.टी. प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक तथा योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, शहादा बी.ए.आय.एफ.च्या प्रोग्रॅम मॅनेजर सोनाली सोनवणे, तसेच यावल प्रकल्पाच्या हर्षाली जावळे उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी अरुण पवार यांनी विद्यापीठाकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल योगशास्त्र विभागाचे विशेष आभार मानले. अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी विद्यापीठ आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव अग्रेसर असून नंदुरबार येथील शैक्षणिक अॅकॅडमीद्वारे स्थानिक गरजांनुसार सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश देत त्यांनी उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी कुशल योगप्रशिक्षक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर विश्वकर्मा यांनी केले. सी.ए.डी.पी. व डी.एस.टी. प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. लीना चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन इंजि. राजेश पाटील यांनी केले.
या प्रशिक्षणात पौगंडावस्थेतील आदिवासी मुलींच्या मासिक रजकाळातील शारीरिक व मानसिक समस्या लक्षात घेऊन सूर्यनमस्कार, कंधरासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन तसेच भ्रामरी प्राणायाम यांचे शास्त्रोक्त मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देण्यात आली. डॉ. लीना चौधरी, फिल्ड वर्कर डॉ. सरिता महाजन व जागृती मोरे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सहभागी मुलींच्या पल्मनरी फंक्शन टेस्ट तसेच मासिक पाळीशी संबंधित प्रश्नावली भरून घेण्यात आली.
कार्यशाळेअंतर्गत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील बी.ए.आय.एफ.च्या प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. पुनम पाटील यांनी पौगंडावस्थेतील मुलींचे स्वास्थ व योगाभ्यास, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना चौधरी यांनी पौगंडावस्थेतील शारीरिक-मानसिक वाढ व त्यातील समस्या, तर डॉ. राहुल मयुर यांनी ‘माइंड युअर माइंड’ (मानसिक स्वास्थ) या विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट, हैदराबादच्या क्षेत्रीय समन्वयक श्रीमती मीनाक्षी पाटील व अपूर्वा अग्रवाल यांनी हार्टफुलनेस मेडिटेशन सत्र घेतले.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन प्रायोजित सिलेज आधारित क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, केंद्र शासन प्रायोजित प्रकल्पांतर्गत हा उपक्रम योगशास्त्र विभागाच्या योग हॉलमध्ये राबविण्यात आला. या कार्यशाळेत आदिवासी विकास प्रकल्प यावल विभागातील २० विद्यार्थिनी, नंदुरबार विभागातील २६ विद्यार्थिनी तसेच ६ शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. गितांजली भंगाळे, प्रा. लिंता चौधरी, रत्नाकर सोनार, अधिकार पाटील व भगवान साळुंखे यांनी मोलाचे सहकार्य केले.









