हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी ”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
२४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन व योगदानाबाबत जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शासन स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले. यापूर्वी मुंबई व नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद-की-चादर” कार्यक्रमांना अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद लाभला असून नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या नांदेड येथे जाण्यासाठी व येण्याची व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले.
कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी प्रशासनामार्फत सिनेमागृहांमध्ये जनजागृतीपर क्लिप्स दाखविणे, शाळांमध्ये प्रभात फेऱ्या, चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धांचे आयोजन अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील टप्प्यात जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर भाविकांना नांदेड येथे नेण्यासाठी वाहतूक, इंधन व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजिक संस्था,उद्योग यांनी मदत करावी असे जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले.
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स, कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन, औषधे, किराणा माल तसेच लंगर व्यवस्थेसाठी आवश्यक साहित्य पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याने इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी श्री घुगे यांनी केले.
कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मदतीबाबतची माहिती दि. २३ जानेवारीपर्यंत संकलित करून पाठविण्यात येणार असून त्यानुसार समन्वय साधून आवश्यक साहित्य व सुविधा नांदेड येथे पाठविण्यात येतील. शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचल्यास व्यवस्थापनात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वेळेत माहिती देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी केले.
देशातून तसेच राज्यातून अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व सेवा भावी संस्था, युवक-युवती व विविध समाजघटकांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केल्यास हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी व्यक्त केला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तहसीलदार, शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहिवाल, वाल्मिकी उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदाय या नऊ समाजांचे प्रतिनिधी, रेड क्रॉस तसेच जळगाव उद्योग क्षेत्रातील सुप्रिम व जैन संस्थांचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









