दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला ! दोन लाखांचा ऐवज लंपास

पारोळा तालुक्यातील मोरफळ येथील घटना ; पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील मोरफळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून तब्बल २ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. १७ जानेवारी रात्री १०.३० ते १८ जानेवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी दिलीप लोटन पाटील (वय ५१, व्यवसाय शेती, रा. मोरफळ, ता. पारोळा) हे आपल्या राहत्या घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट व पेटी उघडून सोने-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेण्यात आली. याच दरम्यान, शेजारील प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या घरातही चोरी झाल्याचे उघड झाले.
चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून ५२ हजार रुपये रोख, सुमारे १३.९ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मणींच्या पोतातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे टॉगल, तसेच ५० ग्रॅम वजनाची चांदीची कडे व चौकणी तुकडा असा मौल्यवान ऐवज लंपास केला. तसेच, प्रमोद पाटील यांच्या घरातून ३५ हजार रुपये रोख चोरून नेण्यात आले. एकूण चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत २,०३,००० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात BNS कलम 305(अ), 331(4) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









