रिधूर गावात दोन भावांवर लोखंडी पहार व दांडक्यांनी हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील रिधूर गावात सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तणावाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले. गुरांच्या शेडसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून पाच जणांच्या टोळीने दोन भावांवर लोखंडी पहार व दांडक्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी, दि. १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिधूर येथील रहिवासी फिर्यादी धनराज बुधा पाटील (वय ५१) व त्यांचे भाऊ वसंत पाटील हे रविवारी दुपारी आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी गावातीलच शरद एकनाथ कोळी हा गुरांच्या शेडसाठी सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर खड्डे खोदून बांधकाम करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने पाटील बंधूंनी यास विरोध केला.
या विरोधाचा राग आल्याने आरोपी शरद एकनाथ कोळी, विशाल ईश्वर कोळी, अजय ईश्वर कोळी, अनिताबाई शरद कोळी व अक्षय सूर्यभान कोळी यांनी संगनमत करून पाटील बंधूंना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद अधिक चिघळताच शरद कोळी याने हातातील जड लोखंडी पहारीने वसंत पाटील यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात वसंत पाटील यांचे डोके फुटून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्याच वेळी विशाल कोळी याने लाकडी दांडक्याने फिर्यादी धनराज पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले.
या प्रकारानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी धनराज पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









