शेतकऱ्याचा शेतात झाडाला दोरीने गळफास

पारोळा तालुक्यातील दळवेल परिसरातील घटना ; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील डोळवेल परिसरात शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत ५८ वर्षीय शेतकरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बाळू कौतिक पाटील (वय ५८, रा. दळवेल, ता. पारोळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून रविवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू पाटील हे सकाळी सुमारे पाच वाजता शेतात गेले होते. मात्र सकाळी आठ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. यावेळी शेतातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी वाहनाने पारोळा येथील कुंटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची नोंद पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









