नवी दिल्ली येथे झाला सन्मान
जळगाव ( प्रतिनिधी ) – हिंदी भाषा व देवनागरी लिपीच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ता. जळगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रदीपकुमार कळसकर यांना हिंदी साहित्यातील प्रतिष्ठित ‘भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय गौरव सन्मान–२०२६’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान देवनागरी फाउंडेशन, भारत तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ जानेवारी रोजी राजेंद्र भवन, आय.टी.ओ., नवी दिल्ली येथे आयोजित भव्य व सन्माननीय समारंभात प्रदान करण्यात आला.

या समारंभाची शोभा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वानांच्या उपस्थितीमुळे अधिकच वाढली. इंडोनेशियातून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे रसाचार्य डॉ. आय. मेड धर्मयाशा, डॉ. सौरभ पांडेय (मानद कुलगुरू, जगत धर्म चक्रवर्ती धरा धाम विश्व सद्भाव पीठ), प्रा. देवेश कुमार मिश्रा (आचार्य, संस्कृत व मानवीकी पीठप्रमुख, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली) तसेच डॉ. नारायण यादव (संचालक, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, श्रीलंका) यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी संयुक्त राष्ट्र, अमेरिका येथील अधिकृत प्रतिनिधी जनरल सर प्रा. डॉ. जसवीर सिंग, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ व हिंदी संवर्धक (न्यूयॉर्क) श्री. इंद्रजीत शर्मा तसेच देवनागरी फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव डॉ. सुनील कुमार दुबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रदीपकुमार कळसकर यांना सन्मान प्रदान करताना प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या शैक्षणिक संशोधन कार्याचे, हिंदी साहित्यावरील निष्ठेचे तसेच देवनागरी लिपीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना डॉ. प्रदीपकुमार कळसकर यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, हा सन्मान केवळ त्यांचा नसून समस्त हिंदीप्रेमी व हिंदी सेवकांचा सामूहिक सन्मान आहे. तसेच या पुरस्कारामुळे देवनागरी व हिंदीच्या सेवेसाठी अधिक उत्साह व ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी तसेच हिंदी अध्यापक संघाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व हा सन्मान संपूर्ण महाविद्यालय व कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले. यापूर्वीही डॉ. प्रदीपकुमार कळसकर यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले असून, शिक्षण क्षेत्रात हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
या निमित्ताने आयोजित परिसंवादात विद्वानांनी देवनागरी लिपीचे ऐतिहासिक महत्त्व, जागतिक संदर्भातील तिची उपयुक्तता तसेच भारतीय ज्ञानपरंपरेच्या संरक्षण व प्रसारावर सखोल चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत सहज व प्रभावी पद्धतीने करण्यात आले. देवनागरी भाषा-संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित सर्व सहभागींसाठी हा कार्यक्रम स्मरणीय व प्रेरणादायी ठरला.









