जळगाव महानगरपालिका निवडणूक : शिवसेना जिल्हाप्रमुखांची पोलीस ठाण्यात धाव
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. दिवसभर शहरात चुरशीचे वातावरण असतानाच प्रभाग क्रमांक ५ मध्ये बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून दोन उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला. अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यात झालेल्या या हमरातुमरीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद थांबवण्यात आला. मात्र रात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे विष्णू भंगाळे यांनी तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती.



निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग ५ मधील आर. आर. विद्यालय मतदान केंद्राबाहेर दुपारी मोठा गोंधळ उडाला. चाळीसगाव तालुक्यातून बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप ॲड. पियुष पाटील यांनी केला. यावरून पाटील आणि विष्णू भंगाळे यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हमरातुमरीमध्ये झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि दोन्ही उमेदवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी हा वाद पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. विष्णू भंगाळे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठले असून पियुष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.








