जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घटना
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कुसुंबा फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर चालक अपघाताची माहिती न देता वाहन घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


समाधान लोटन पाटील (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) हे दि. ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास कुसुंबा बस स्थानकाजवळ छत्रपती संभाजीनगर ते जळगाव दरम्यानचा महामार्ग ओलांडत होते. यावेळी संभाजीनगरकडून जळगावकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच -२८ बीबी ५०२६) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपले वाहन भरधाव वेगात चालवले.
संशयित बोलेरो चालकाने समाधान पाटील यांना जोराची धडक दिली. या धडकेत समाधान पाटील यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी चालक निलेश रत्नाकर लोढे (वय ३१, रा. वरखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हा वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातानंतर जखमी समाधान यांचे वडील लोटन जालम पाटील (वय ६५) यांनी १३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक निलेश लोढे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गफ्फूर तडवी करत आहेत.








