मतरूपी ‘जोगवा’ मागत मतदारांचे वेधले लक्ष; अभिनव प्रचाराची प्रभागात चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत आहेत. प्रभाग १५ ‘अ’ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अरविंद देशमुख यांनी आज चक्क *’वासुदेवा’*चा वेश परिधान करून प्रभागात प्रचार केला. त्यांच्या या हटके वेशभूषेने आणि मतरूपी ‘जोगवा’ मागण्याच्या शैलीने मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

डोक्यावर मयूरपंख लावलेली शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढरा अंगरखा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या अशा पूर्ण वासुदेवाच्या रूपात अरविंद देशमुख प्रभागात फिरले. “दान पावलं… दान पावलं…” अशी साद घालत त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी मतदारांकडे आपल्या मताचे दान मागितले. परंपरेचा आधार घेत केलेला हा प्रचार सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी बोलताना अरविंद देशमुख म्हणाले की, “ज्याप्रमाणे वासुदेव पहाटे येऊन साद घालतो, त्याप्रमाणे मी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाची पहाट आणण्यासाठी मतदारांच्या दारात आलो आहे. मतरूपी जोगवा मागून मला संधी द्या, मी प्रभागाचा कायापालट करून दाखवेन.”
या अभिनव प्रचार मोहिमेदरम्यान भाजपच्या पॅनेलचे इतर उमेदवारदेखील उपस्थित होते. आपल्या सहकाऱ्याच्या या कल्पक प्रचाराला त्यांनीही साथ दिली. मतदारांनीही आपल्या दारात आलेल्या या ‘राजकीय वासुदेवा’चे कुतूहलाने स्वागत केले. पारंपारिक वेशभूषा आणि विकासाची साद यामुळे प्रभाग १५ ‘अ’ मधील निवडणुकीची रंगत आता अधिकच वाढली आहे.









