मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ५ ‘ड’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन बालमुकुंद लढ्ढा यांच्या प्रचारार्थ आज प्रभागात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.

या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. या दोन्ही बड्या नेत्यांनी नितीन लढ्ढा यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांशी संवाद साधला. रॅलीदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रभागातील विविध भागांतून निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी उमेदवाराचे औक्षण केले, तर ज्येष्ठांनी विजयाचा आशीर्वाद दिला. नितीन लढ्ढा यांच्या जनसंपर्कामुळे आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “नितीन लढ्ढा हे अनुभवी आणि कार्यतत्पर उमेदवार आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुती कटिबद्ध असून, नागरिकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.” तर खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचा विजय गरजेचा असल्याचे सांगितले. उमेदवार नितीन लढ्ढा यांनी या प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले आणि प्रभागातील नागरी समस्या सोडवण्याला आपले प्राधान्य असेल, असे आश्वासन दिले. या रॅलीमुळे प्रभाग ५ ‘ड’ मधील महायुतीच्या प्रचाराने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.










