प्रभाग ७ मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज शनिवारी प्रभाग ७ मधील उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. रिंग रोडपासून सुरू झालेल्या या रॅलीत मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भरभरून आशीर्वाद घेऊन उमेदवार भावुक झाले. रिंगरोडकरांनी यावेळी पाठिंब्याची साद दिली.


ही रॅली रिंग रोडवरून सुरू होऊन ब्रूकबॉन्ड कॉलनी, संगम सोसायटी आणि यशवंत कॉलनी मार्गे पुढे सरकली. रॅलीचा समारोप साईबाबा मंदिर परिसरात करण्यात आला. ठिकठिकाणी रहिवाशांनी उमेदवारांचे स्वागत केले. विशेषतः महिला वर्गाने ठिकठिकाणी औक्षण करून अत्तरदे व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महिला भगिनींनी केलेले स्वागत आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद विजयाचा विश्वास अधिक दृढ करत आहेत.

या प्रचार रॅलीत चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासोबत उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मनोज काळे, प्रवीण महाजन, ऋषिकेश शिंदे, सचिन बाविस्कर, हेमंत चौधरी, हेमू चौधरी, चेतन तिवारी, प्रीतम गुजर,मिलिंद बोरोले, जयेश चौधरी, दीपक चौधरी सहभागी होते.प्रचाराच्या या रणधुमाळीत महिला शक्तीचे दर्शन घडले. रॅलीमध्ये माधुरी अत्तरदे, नैना चौधरी, दर्शना मोदी, नंदिनी राणा यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मतदारांशी थेट संवाद साधला.
“प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासोबतच प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे,” असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत, येणाऱ्या काळात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.









