विश्वास ठेवा, महायुती नक्कीच विकास करेल ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जळगाव ( प्रतिनिधी ) – “निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना जनता कधीही निवडून देत नाही. आमदारांच्या परिवारात तिकीट द्यायचे नाही, असे आमचे धोरण ठरले होते. मात्र, काही ठिकाणी ऐनवेळी अर्ज भरले गेले आणि तिथे पर्यायी उमेदवार उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागले,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण यांनी काय टीका केली ती त्यांची वैयक्तिक बाब असू शकते, मात्र पक्ष विरहित आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचे योगदान मोठे आहे.”
यावेळी फडणवीस यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली. बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. बंडखोरांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न केला, पण काही जागी तांत्रिक कारणांमुळे उमेदवार कायम ठेवावे लागले, असेही ते म्हणाले.









