आ. राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी

येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आ. राजूमामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.

सुरुवातीला रायसोनी नगर येथील हनुमान मंदिर येथे प्रभाग १३ अ चे उमेदवार नितीन सपके, १३ ब चे उमेदवार सुरेखा नितीन तायडे, १३ क चे बिनविरोध निश्चित उमेदवार वैशाली अमित पाटील, १३ ड चे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांनी पूजा केली. त्यानंतर आ. राजूमामा भोळे व गुलाबराव देवकर यांच्या हस्ते प्रचार नारळ फोडण्यात आला. यानंतर प्रभागातून नागरिकांना आवाहन करीत प्रचारफेरी काढण्यात आली.
प्रचार दौरा सुरू होताच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीने प्रभागातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले. रॅली दरम्यान उमेदवारांनी प्रभागातील घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. प्रभाग १३मधील नागरी समस्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन उमेदवार रिंगणात उतरल्या असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.









