विकासकामे झाली, तरी मी समाधानी नाही… आमच्यातील काही लोक फुटून निघून गेली…
जळगाव महायुतीच्या सभेमधील मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण चर्चेत
जळगाव विशेष प्रतिनिधी : पुढाऱ्याचे पुढे आणि गाढवाच्या मागे कधी उभे राहू नये, अन्यथा पंचाईत होते. महापालिकेत मागील काळात आम्ही सुरुवातीला विकास कामे केली. मात्र आमच्यातीलच लोक फुटून पळून गेली. त्यामुळे काही कामे राहून गेली. शहराचा बराच विकासाचा अनुशेष भरून काढला. मात्र तरी समाधानी नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या महायुतीच्या सभेत प्रतिपादन केले.

जळगाव शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पिंप्राळा उपनगरात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्ष बदल तसेच काही पदाधिकारी व नेत्यांची भूमिका यावर भाष्य केले. राजकारणात नेहमी शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतात. स्वार्थासाठी भूमिका बदलणारे आणि चुकीच्या नेतृत्वामागे अंधपणे जाणारे लोक शेवटी अडचणीत सापडतात. त्यामुळे कोणाच्या पुढे बसायचे आणि कोणाच्या मागे उभे राहायचे, याचा विचार केला पाहिजे,” असे महाजन म्हणाले. महाजन यांनी स्पष्ट शब्दांत नाव न घेता काही स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांवर निशाणा साधला. “जनतेसाठी काम करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते. विकासकामे, पारदर्शकता आणि ठोस नेतृत्व यालाच लोक पाठिंबा देतात,” असा दावाही महाजन यांनी केला.
“गेल्या वेळी जळगाव महापालिकेच्या ५७ जागांवर भाजपचा विजय झाला होता. मात्र, काही जण ऐनवेळी पक्ष सोडून गेल्याने आमच्या प्रयत्नांना खीळ बसली. आणि अपेक्षित विकासकामे करता आली नाहीत. तरीदेखील जळगाव शहरातील मतदारांनी विधानसभेसह लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला भरभरून पाठिंबा दिला,” असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येही मतदारांनी जिल्ह्यात महायुतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निकाल शंभर टक्के महायुतीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात महापालिकेत सत्ता मिळाल्यास दोन वर्षात जळगाव शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार महाजन यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला मतदान केल्यास शहराचा विकास पुन्हा एकदा खोळंबण्याची शक्यता आहे. महायुतीला संधी दिल्यास शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटचे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रकल्पांचा उल्लेख करताना महाजन म्हणाले की, जळगाव विमानतळावर प्रवासी आणि कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतीमालाची वाहतूक अधिक सुरळीत होईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून उद्योजक मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये येतील. परिणामी, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला पुन्हा एकदा महापालिकेत संधी देण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील, आ.अमोल जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व्यासपीठावर उपस्थित होते.









