वरणगाव पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनियर क्लार्क आणि वार्डबॉय या पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पुणे येथील एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अतुल शिवाजीराव शेटे (वय ५८, रा. अजय नगर, वरणगाव) हे वरणगाव सिनियर कॉलेजमध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या साक्षीदारांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. संशयित आरोपी नेहा निनाद नाईक (रा. पुणे) हिने पुणे महानगरपालिकेत रिक्त असलेल्या जागांवर भरती करून देण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी अतुल शेटे यांनी वेळोवेळी नेहा नाईक हिला ४,८०,००० रुपये दिले. श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन आणि विजय घौसास या साक्षीदारांनी नोकरीसाठी २,९९,००० रुपये महिलेला दिले. अशा प्रकारे एकूण ७,७९,००० रुपये नोकरीच्या नावाखाली उकळण्यात आले.
पैसे देऊनही कोणालाही नोकरी मिळाली नाही आणि दिलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२३ ते ६ मार्च २०२४ या कालावधीत घडला. फिर्यादीच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२६ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर, सुभाष ढवळे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयित आरोपी नेहा नाईक हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.









