यावल तालुक्यात भालोद शिवारातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील भालोद गावाबाहेर असलेल्या कुलस्वामिनी एकविरा माता व म्हाळसा माता देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. १ जानेवारीच्या रात्री झालेल्या या घटनेत चोरट्यांनी देवीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

मंदिराचे अध्यक्ष नारायण शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी रोजी रात्री ८ ते २ जानेवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. सोन्याचे दागिने १५,००० रुपये किमतीच्या देवीच्या दोन ग्राम वजनाच्या सोन्याच्या वाट्या.मंदिरातील लोखंडी दानपेटी तोडून त्यातील अंदाजे १५,००० रुपयांची रोकड, ३,००० रुपये किमतीचे म्युझिक सिस्टमचे मशीन, २,५०० रुपयांचा एल.ई.डी. फोकस लाईट आणि ३,००० रुपयांचा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, १,५०० रुपये किमतीचे देवीच्या अंगावरील बेन्टेक्सचे दागिने असे चोरीस गेले आहे.
अशा प्रकारे एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. चोरट्यांनी केवळ चोरीच केली नाही, तर मंदिरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचेही नुकसान केले आहे.या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष प्रल्हाद चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही.









