गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाचे ४ थे वर्ष
जळगाव ( प्रतिनिधी ) – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने नवीन वर्षाचे स्वागत पीस वॉकसारख्या अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता आणणाऱ्या उपक्रमाने करण्यात आले. जैन उद्योग समूहच्या जैन व्हॅलीच्या नक्षत्र गार्डन परिसरात, निसर्गरम्य वातावरणात पंचमहाभूत तत्वे विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी असलेला संबंध उलगडण्यात आला.

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि पंचतत्वे आणि मानवी जीवन यांचा संबंध वैज्ञानिक व आध्यात्मिकदृष्ट्या समजावून सांगण्यात आला. निसर्गातील पंच महाभूत तत्त्वे उपलब्ध करुन देणाऱ्यांप्रती कायम कृतज्ञता बाळगली पाहिजे असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रा. डॉ. अश्विन झाला यांनी यावेळी केले.
त्यांनी कबीराचे दोहे, संत वचने, सुप्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांची उदाहरणे देत मानवी शरीराचा पंचतत्वांशी असलेला संबंध विशद केला. सहभागींनी आपल्या प्रतिक्रियेत अशा प्रकारच्या पीस वॉकचे नियमित आयोजन करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. जीवनातील शांतीचा सुखद अनुभव घेता आला याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले. आगामी काळात जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांना घेऊन पीस वॉकचे आयोजन करावे अशी सूचनाही केली.
पीस वॉकमध्ये डॉ. सुहास गाजरे, डॉ. विकास गीते, नितीन अट्रावलकर, सुनील चौधरी, अनिल गडे, दीपक चौधरी, अरविंद पाटील, स्वप्नील भोई, मिलिंद खारुळ, महेश शिंपी, विनया कुलकर्णी, उल्हास सुतार, दीपक मिश्रा, संस्थेचे समन्वयक उदय महाजन यासह ३३ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता. परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.








