वर्ग ३ चे कर्मचारी लाच घेण्यात आघाडीवर
जळगाव (प्रतिनिधी):- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने सन २०२५ मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी मोहीम राबवली आहे. वर्षभरात एकूण ४५ यशस्वी सापळा कारवाया करण्यात आल्या असून, यात ७८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या तुलनेत यंदा कारवायांच्या संख्येत ८ ने वाढ झाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाही महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागात ७ कारवायांमध्ये १३ जणांना जाळ्यात ओढण्यात आले. त्यापाठोपाठ पोलीस विभाग, जिल्हा परिषद आणि महावितरण या विभागात प्रत्येकी ५ कारवाया करण्यात आल्या आहेत.
विविध विभागांतील कारवायांचा तपशील
महसूल विभाग: ७ कारवाया (१३ आरोपी)
पोलीस विभाग: ५ कारवाया (९ आरोपी)
जिल्हा परिषद: ५ कारवाया (६ आरोपी)
महावितरण: ५ कारवाया (५ आरोपी)
शिक्षण विभाग: ४ कारवाया (७ आरोपी)
वन विभाग: ३ कारवाया (९ आरोपी)
महानगरपालिका/नगरपालिका: एकूण ३ कारवाया (६ आरोपी)
या कारवाईत केवळ कनिष्ठ कर्मचारीच नव्हे, तर वरिष्ठ अधिकारीही जाळ्यात अडकले आहेत. अटक करण्यात आलेल्या ७८ आरोपींमध्ये:
वर्ग १ चे अधिकारी: ०३
वर्ग २ चे अधिकारी: ०६
वर्ग ३ चे कर्मचारी: ३५
वर्ग ४ चे कर्मचारी: ०४
इतर लोकसेवक व खाजगी व्यक्ती: ३० जण यांचा समावेश आहे.









