जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनंतर सेनेचेही खाते उघडले
जळगाव प्रतिनिधी येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही बिनविरोधाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८ अ मधून शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.


चोपड्याचे आ.प्रा.डॉ. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांचे डॉ. गौरव सोनवणे हे सुपुत्र आहेत. महानगरपालिकेमध्ये तरुण तडफदार व सुशिक्षित उमेदवारांची आता इंट्री झाली आहे. प्रभाग क्रमांक १८ अ मध्ये शिवसेनेने डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांना संधी दिली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी अर्ज भरला होता. छाननीअंती दोन्ही अर्ज वैध ठरले होते.मात्र गुरुवारी दि. १ जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरुवातीला चंद्रशेखर सोनवणे यांनी माघार घेतल्याने डॉ.गौरव सोनवणे बिनविरोध विजयी होण्याचे मार्ग आता मोकळे झाले आहेत.
यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये डॉ. गौरव सोनवणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










