जळगाव तालुक्यात कानळदा रोडवर घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरालगतच्या कानळदा ते जळगाव रोडवर मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने ही घटना घडली असून, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अशोक नंदकिशोर तिवारी (रा. प्रजापत नगर, जळगाव) हे मंगळवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ९:३० ते १० वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरून जात होते. सिव्हील हॉस्पिटलच्या अलीकडे, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच १९ सिव्हि ८५१०) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अशोक तिवारी यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक प्रशांत पुनमचंद तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किरण आगोने पुढील तपास करत आहेत. सध्या ट्रॅक्टर चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रजापत नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









