प्रभागातील नागरिकांसह समर्थकांचा पाठिंबा
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी नाराजी आता समोर आली आहे. यातच प्रभाग १३ मध्ये गेल्या ५ वर्षात नेत्रदीपक कामगिरी करणारे भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनाही पक्षाने डावलल्याने मोठी नाराजी पसरली आहे. जितेंद्र मराठे यांनी अपक्ष उमेदवारी लढवावी अशी इच्छा नागरिकांसह समर्थकांनी व्यक्त केली आहे.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष ४७, शिवसेना २३, राष्ट्रवादीला ५ जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत. यात महाबळ ते रायसोनी नगर, आदर्श नगर, नेहरू नगर हे परिसर असलेला प्रभाग १३ मध्ये मागील टर्मला भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले होते. यात सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, ज्योती चव्हाण यांचा समावेश होता. गेल्या पंचवार्षिकमध्ये जितेंद्र मराठे यांनी लक्षवेधी कामगिरी करून प्रभागात विकासकामे पाठपुरावा करून आणली होती.
यंदाच्या निवडणुकीतदेखील चांगला जनसंपर्क असल्यामुळे जितेंद्र मराठे यांचे तिकीट अंतिम मानले जात होते. मात्र सोमवारी रात्रभरात घडामोडी घडल्या. १३ ड हि सर्वसाधारण प्रवर्गातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला गेली. त्यातच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे द्वितीय चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांना हि उमेदवारी मिळाल्याने प्रभागात नाराजी पसरली आहे. काम करणाऱ्या उमेदवारापेक्षा निष्क्रिय उमेदवारांना तिकीट मिळाल्यामुळे समर्थकांसह प्रभागातील नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे. जितेंद्र मराठे यांनी लोकाग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढविण्यार असल्याची माहिती दिली आहे.









