पाचोरा येथील आ. किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महानगरपालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना, सोमवारी २९ डिसेंबर रोजी जळगाव महानगरपालिका परिसरात राजकीय चैतन्य पाहायला मिळाले. शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

आज सकाळी ११ वाजेपासूनच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत इच्छुक उमेदवारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विशेषतः दुपारी २ वाजेपर्यंत अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पालिका आवाराला एखाद्या मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटातील अनेक बड्या नेत्यांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये महानगरप्रमुख संतोष पाटील, सागर शाम सोनवणे, पायल दारकुंडे यांनी प्रभाग २ मधून तर नरेंद्र आत्माराम पाटील (राजपूत) हे प्रभाग ०८ आणि माजी महापौर तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी ५ मधून अर्ज भरला. या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह पालिकेत प्रवेश केला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “जळगाव महानगरपालिकेची निवडणूक महायुती पूर्ण ताकदीने लढणार आहे. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम असून, येणाऱ्या निकालात महायुतीचाच झेंडा महापालिकेवर फडकलेला दिसेल. शहराच्या विकासासाठी जनता महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते देईल.”









