समाजसेवेचा वसा निरंतर सुरु ठेवण्याची प्रतिक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी अर्जाचा पाऊस पडला. दुसरीकडे प्रभाग ११ मधून कोल्हे घराण्यातून यंदा तिघे सदस्य मंगळवारी अर्ज भरणार आहे.

मनपा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून काही कुटुंबातील सदस्यांचे नेहमी वर्चस्व राहिले आहे. यात नगरपालिकेपासून तर सध्याच्या मनपात कोल्हे कुटुंबातील अनेक सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तत्कालीन नगरपालिकेत पंडितराव कोल्हे यांनी नगराध्यक्षपद देखील भूषविले. तसेच अनेक तीन पंचवार्षिकपर्यंत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. पंडीतराव कोल्हे यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी देखील त्यांचा राजकीय वारसा पुढे नेला. विजय कोल्हे हे गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत निवडून येत होते. दिलीप कोल्हे हे सुद्धा तीन पंचवार्षिक नगरसेवक राहीले. जुन्या जळगाव भागात कोल्हे कुटूंबियांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे.
मनपाची स्थापना २००३ मध्ये झाल्यानंतर शहराच्या प्रथम महापौर होण्याचा मान हा देखील कोल्हे कुटुंबीयांनाच मिळाला. नगरसेविका आशा कोल्हे यांनी पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला होता. यासह विजय कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यादेखील तत्कालीन नगरपालिकेत नगराध्यक्ष राहिल्या. ललित कोल्हे यांनी आजोबा व वडील यांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला आहे. महापौर म्हणूनही त्यांना सुरेशदादा जैन यांनी संधी दिली. यानंतर मागील पंचवार्षिकला ललित कोल्हे व त्यांच्या मातोश्री सिंधुताई कोल्हे ह्या नगरसेविका होत्या.
यंदा माजी महापौर ललित कोल्हे हे प्रभाग ११, सिंधुताई कोल्हे ह्या १२ तर ललित कोल्हे यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे प्रभाग ४ येथून शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवीत आहे. तिघांचेही उमेदवारी अर्ज हे मंगळवारी दाखल केले जाणार आहे.









