
छत्रपती संभाजीनगर शहरातून ५ मारेकऱ्यांना अटक, सिल्लोड तालुका हादरला
सिल्लोड (वृत्तसेवा) : बोदवड (ता. सिल्लोड) येथील व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांचा अपहरणकर्त्यांनी मारून खून करून चाळीसगाव घाटात मृतदेह फेकून दिला. अपहरणकर्त्या ५ जणांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार आज २९ डिसेंबरला पहाटे समोर आला. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव- बोदवड रस्त्यावरून गव्हाण यांचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांच्या मुलाला तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
गव्हाणे यांचे बोदवड येथे कृषी सेवा केंद्र आहे. ते व्यापाऱ्यांकडून मकाचे पैसे आणण्यासाठी शनिवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचला उंडणगावला गेले होते. त्यांनी व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आणि रात्री ८ ला दुचाकीने (क्र. एमएच २० जीएफ ०४४३) घरी परतत असताना रस्त्यातच त्यांचे अपहरण झाले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने मुलाने शोधाशोध सुरू केली. अखेर रात्री उशिरा अजिंठा पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
त्यानंतर मध्यरात्री १२ ला तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाइलवरून कॉल आला. त्यावर अपहरणकर्ते बोलत होते. त्यांनी ‘तुझ्या वडिलांचे आम्ही अपहरण केले असून, तू आम्ही सांगू तेथे एक कोटी रुपये घेऊन ये, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगा घाबरून गेला. त्यानंतर काही वेळातच पुन्हा त्याच्या काकांना फोन करून २ कोटींची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. त्यांची मागणी वाढतच चालल्याने कुटुंबीयांनी ही बाब पोलिसांना कळवली. त्यानंतर अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह वडोदबाजार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने शोध घेण्यात येत होता. आज पहाटे चाळीसगाव घाटात त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. त्यांचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या पाच जणांना छत्रपती संभाजीनगर शहरातून ताब्यात घेण्यात आले असून, हे पाचही जण सिल्लोड तालुक्यातील आहेत. यात गोळेगावचे २ जण, पालोदवाडीचे २ जण आणि पानवडोद १ जण आहे. अद्याप त्यांची नावे पोलिसांनी स्पष्ट केली नाहीत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी गव्हाणे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात फेकून दिल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हत्येचे नेमके कारण पैसेच होते, की आणखी काही, याचा तपास केला जात आहे.









