पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी)- पतीने ‘तलाक’ दिल्यानंतरही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ३७ वर्षीय पीडित महिलेचा विवाह संशयित आरोपी मोहम्मद कैफ अब्दुल अजीज याच्याशी झाला होता. संसारादरम्यान पती, सासू, सासरे, नानी सासू आणि दीर यांनी संगनमत करून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती. दरम्यान, ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी पतीने पीडितेस ‘तलाक’ देऊन घराबाहेर काढले. तलाकनंतर पीडिता भडगाव येथे राहण्यास गेली होती. मात्र, पतीने तिच्या मोबाईलमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
या धमकीच्या जोरावर पतीने ११ ऑक्टोबर रोजी नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळील एका बंद फॅक्टरीत आणि १० डिसेंबर रोजी कजगाव येथील एका हॉटेलमध्ये पीडितेवर जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पती मोहम्मद कैफ अब्दुल अजीज, नानी सासू नफिसा शेख नजमोद्दीन, सासू नसरीन शेख अजीज, सासरे शेख अजीज शेख सत्तार आणि दीर मोहम्मद जैब अब्दुल अजीज (सर्व रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मोरे करत आहेत.









