उमेदवारीबाबत गिरीश महाजनांशी इच्छुक उमेदवारांची बंद दाराआड चर्चा
जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी शनिवारी संध्याकाळी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले अन यशाचा मंत्र देण्याचा प्रयत्न केला मात्र दुसरीकडे बैठक संपल्यावर बंद दाराआड इच्छुक उमेदवारांशि चर्चा देखील केली. या चर्चेत अपेक्षित बंड हे थंड करण्यामध्ये नेते यशस्वी होणार काय ? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

एकीकडे भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा असताना दुसरीकडे मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष देखील एकत्र लढणार असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा आता हिरमोड झालेला आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना व तरुण कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही याबाबत संकेत मिळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी जी. एम. फाउंडेशन कार्यालयामध्ये मंत्री गिरीश महाजन यांची अनेक इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली. भेटीमध्ये त्यांनी नेत्यांना विनवणी सुरू केली आहे.
तसेच विविध प्रभागांमध्ये कुठे कुठे बंड होतील याबाबत नेत्यांना पुसटशी कल्पना असल्यामुळे हे बंड थंड करण्यासाठी आता नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता नेत्यांच्या पातळीवर सुरू असून यासाठी विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. यामध्ये विविध पदे तसेच स्वीकृत नगरसेवक अशी आमिषे नेत्यांकडून निष्ठावंत व तरुण तडफदार कार्यकर्त्यांना दाखवली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
बंद दाराआड नेमकी चर्चा काय सुरू आहे, कोणत्या मुद्द्यांवर नेते समजुत घालत आहेत याबाबत बाहेर इतर कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती.तसेच अनेकांमध्ये आता घालमेल सुरू झाली आहे.








