तरुण कुढापा मंडळातर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : भक्त प्रल्हादची कथा ही अढळ भक्ती, वडिलांचा विरोध आणि देवाचे रक्षण याभोवती फिरते, जिथे हिरण्यकशिपू नावाच्या अहंकारी राक्षसी राजाचा पुत्र प्रल्हाद हा जन्मतःच भगवान विष्णूचा परम भक्त होता, ज्यामुळे हिरण्यकशिपूने त्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकशिपूचा वध केला, हेच या कथेचे सार आहे, असे प्रतिपादन कीर्तन भूषण हभप सूर्यभान महाराज यांनी केले.


शहरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रीमद भागवत कथेचे आयोजन दि. २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. दि. १ जानेवारी काल्याचे कीर्तन होऊन समारोप होणार आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशी हभप सूर्यभान महाराज यांनी भक्त प्रल्हादच्या कथेविषयी सांगितले की, भक्ती आणि श्रद्धा असेल तर कोणतीही संकटे आपल्याला हरवू शकत नाहीत. देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो. प्रल्हाद हा त्याच्या निष्पापपणा आणि विष्णूप्रती भक्तीसाठी ओळखला जातो. त्याचे वडील हिरण्यकशिपू आणि कुटुंबीयांचा निंदनीय स्वभाव असूनही तो भगवान विष्णूची उपासना करत राहतो.
संध्याकाळी भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू, भगवान नृसिंह यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. भक्त प्रल्हाद वेशभूषा यज्ञेश भावसार, हिरण्यकश्यपू सुमित सपकाळे तर नृसिंहचा देखावा दीपक बारी यांनी साकारला. या देखाव्यातून हिरण्यकश्यपू वधाचा देखावा आकर्षक ठरला. दिवसभर कथेत महिला, पुरुष भाविक रममाण झाले होते. आरती नंदू चौधरी, महावितरणचे अभियंता मनीष धोटे, नरेश सोनी, हर्षल नेहेते, प्रशांत सुरळकर, बेबाबाई सुरळकर, यश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. रविवारी भागवतकथेत वामनकथा सांगण्यात येणार आहे.









