भारत कृषक समाजाचा संकल्प
जळगाव (प्रतिनिधी) : “स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री आणि भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण आणि शेती क्षेत्रातील महान कार्य घराघरात आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणार,” असा दृढ संकल्प भारत कृषक समाज, महाराष्ट्रच्या वतीने जळगावात करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनानिमित्त भारत कृषक समाज, महाराष्ट्र तर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. देशमुख भाऊसाहेबांनी गरीब आणि गरजू समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांच्या निस्वार्थी कार्यामुळे आणि त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी केलेल्या सेवेमुळेच आज ग्रामीण भागातील तरुण डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि शिक्षक बनून प्रगतीपथावर आहेत, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक गावातील घराघरात पोहोचले पाहिजेत, जेणेकरून तरुण पिढीला त्यातून प्रोत्साहन आणि नवी दिशा मिळेल. हे महान कार्य पुढे नेण्यासाठी भारत कृषक समाजाचे पदाधिकारी कटिबद्ध आहेत. या प्रसंगी भारत कृषक समाज महाराष्ट्राचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांच्यासह अरविंद पाटील लोणाग्रेकर, डॉ. सुधीर पाटील, दिलीप ठाकरे, दिलीप पाटील, अनिल चतरकर, माधव भारसाकळे, सारंग बढे, कैलास इंगळे व इतर सदस्यांनी डॉ. देशमुख यांचे कार्य जनमानसात रुजवण्याचा संकल्प जाहीर केला.









