जळगाव शहरातील टॉवर चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर चौकात दुकानसमोर लोखंडी टेबल लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यापाऱ्यावर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजयकुमार विकास बडगुजर (वय ३९, रा. कांचन नगर, जळगाव) यांचा टॉवर परिसरात व्यापार आहे. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर संशयित आरोपी गोपाल ठाकूर आणि त्याच्या मुलाने लोखंडी टेबल लावले होते. हे टेबल लावण्याला विजयकुमार यांनी विरोध केला असता, त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात संशयित आरोपीने जवळ असलेल्या स्क्रू-ड्रायव्हरने फिर्यादी विजयकुमार यांच्यावर वार करून त्यांना शारीरिक दुखापत केली. तसेच त्यांना शिवीगाळ व धमकावण्यात आले.
या घटनेनंतर जखमी व्यापाऱ्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी गोपाल ठाकूर आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वाघ या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.









