भुसावळ तालुक्यात निंभोरा बुद्रुक येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे घरासमोरून भरधाव वेगात दुचाकी नेणाऱ्या अज्ञात इसमास हटकल्याच्या कारणावरून एका ३४ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात गौतम साळवे (वय ३४) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

दिनांक २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी गौतम साळवे हे आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी एक अज्ञात तरुण त्याच्या दुचाकीवरून अत्यंत वेगात आणि निष्काळजीपणे घरासमोरील रोडवरून गेला. फिर्यादीने त्याला वाहन जोरात का चालवतो असे विचारले असता, त्याचा राग धरून आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी लांब केस असलेल्या अज्ञात आरोपीने आपल्याजवळील चाकू काढून गौतम साळवे यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला गंभीर वार केले. हा वार इतका जोरात होता की फिर्यादी गंभीर जखमी झाले. यावेळी मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या वडिलांनाही आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करत आहेत. हल्लेखोर आरोपी हा लांब केस असलेला असून त्याने काळा-पांढरा टी-शर्ट आणि काळी जीन्स घातलेली होती. पोलीस सध्या या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.









