जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे भवितव्य अधांतरी
जळगाव विशेष प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून पक्ष नेतृत्वाची आता कसोटी लागली आहे. निर्णय घेणाऱ्या पक्ष नेतृत्वावर देखील दबाव येत असून तिकीट नेमके कोणाला द्यायचे याबाबत संभ्रमता पसरली आहे. आयाराम गयारामांच्या भरोशावर भाजप बसली असून निष्ठावंतांची कोंडी मात्र फुटण्याचे चिन्ह दिसत नाही.

महानगरपालिका निवडणूक लागण्याआधी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या १२ माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांना प्रवेश दिला होता. त्यानंतर शुक्रवारपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आले. यापैकी काहींची तिकीट हे निश्चित मानले जात आहे. मात्र यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. काल-परवा पक्षात आलेले आयाराम आणि गयाराम यांना जर पक्ष नेतृत्व तिकिटामध्ये संधी देत असेल तर मग आम्ही अनेक वर्ष फक्त सतरंज्या उचलायचा काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दुसरीकडे इच्छा नसतानाही भाजपमधील अनेक पक्ष नेतृत्वांना वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीमधील घटक पक्षांशी युती करावी लागली आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना तिकिटापासून मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये निस्वार्थीपणे काम करत असलेले कार्यकर्ते मात्र पक्षाकडे नगरसेवक पदासाठी एक संधी मिळावी यासाठी आस लावून बसले आहेत. त्यामुळे आता भाजपच्या पक्ष नेतृत्वाची मोठी कसोटी लागणार आहे. एक नक्की मात्र की, यंदा भाजपचे संख्याबळ महापालिकेत घटणार आहे हे निश्चित आहे.









