जागावाटपाचे सूत्र रविवारी जाहीर होणार ?
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील मित्र पक्ष भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आले आहेत. महायुतीतील तिन्ही घटक एकत्र मिळून निवडणूक लढण्याविषयी आता शिक्कामोर्तब झाले आहे. जागा वाटपाचे सूत्र रविवारी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

जळगावात शुक्रवारी एका बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून या बैठकीनंतर महायुतीची घोषणा करण्यात आली. जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक ही महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लढवावी अशी सूचना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज तीनही पक्षांची एकत्रित बैठक झाली.
बैठकीला भारतीय जनता पक्षाची निवडणूक प्रमुख आ. राजूमामा भोळे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदींची उपस्थिती होती. महानगरपालिकेतील ७५ जागांवर आता महायुती एकत्रित लढणार असून प्रत्येक पक्षाला किती जागा येतील हे आता रविवारी जाहीर होण्याची शक्यता पक्षातील नेत्यांनी दिली आहे.








