आयाराम-गयारामांवर कृपा होणार असल्याने अपक्षांची संख्या वाढणार
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कोंडी होत असल्याचे मोठे चित्र दिसून येत आहे. आमच्यात कुठलीही गटबाजी नाही म्हणणारे भाजप आता उघड गटबाजीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील घडवून आणलेल्या पक्षांतराला कंटाळल्याने स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केला. त्याच पार्श्वभूमीवर आता जळगाव महापालिकेतदेखील अनेक विद्यमान व निष्ठावंतांना तिकीट मिळणार नसल्याचे दिसत असल्याने त्यांनी अपक्ष लढविण्याची तयारी सुरु केली आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची एक विशिष्ट कार्यपद्धती ठरलेली दिसून येत आहे. विरोधी पक्ष कमजोर करायचा. त्यांच्याकडील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश द्यायचा असा सपाटाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लावला आहे. मात्र पक्षात प्रवेश देताना त्याबाबत स्थानिक नेतृत्वाला कुठेही विचारात घेतले जात नसल्याचे आता नाशिक प्रकरणावरून उघड झाले आहे. त्यामुळे पक्षप्रवेश देताना स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले पाहिजे अशी माफक अपेक्षा या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून उघड झाली आहे.
याचाच एक भाग म्हणजे नाशिकमध्ये गुरुवारी दिसून आलेले पक्षांतर नाट्य. स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांना गहिवरून रडू येईपर्यंत भाजपा मध्ये काय चालले आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. जळगाव महानगरपालिकेसाठी शिवसेनेच्या काही नगरसेवकांना देखील मागील महिन्यामध्ये प्रवेश देण्यात आला होता. प्रवेश देताना त्यांना महापालिकेमध्ये तिकीट देण्यात येणार असल्याची खात्री देण्यात आली होती. मात्र आता चित्र पलटले असून महायुतीमधील घटक पक्षांना सोबत घ्यावे की नाही याबाबत अजूनही साशंकता निर्माण झाली आहे. भाजप स्वबळावर ७५ जागा लढू शकतो एवढी त्यांची आज ताकद आहे. तेवढेच निष्ठावंत कार्यकर्ते तिकीटही मागत आहेत.
मात्र दुसरीकडे महायुतीच्या नावाखाली भाजपाचे अनेक प्रभाग हे डावलले जाणार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पक्षाचा कुठलाही व्यक्ती न देता मित्र घटकाचा उमेदवार देण्यामागील भूमिका प्राथमिक दिसून येते. मात्र यामुळे अनेक निष्ठावंत यांची कोंडी होणार आहे. हेच कोंडी टाळण्यासाठी सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत. मात्र आता अर्ज भरण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक असून तिकीट न मिळाल्यास किंवा शक्यता न दिसल्यास थेट पक्षांतराची किंवा अपक्ष म्हणून उभे राहण्याची भूमिका आता भारतीय जनता पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.









