डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची यशोगाथा
जळगाव (प्रतिनिधी) – जीवनातील दुःखद प्रसंग, मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. हा उपचारात्मक प्रवास केवळ वैद्यकीय यशाचाच नाही, तर समाजातील मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.
याबाबत माहिती अशी की, रुग्णाच्या वडिलांचे सुमारे दहा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. या धक्क्याने मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या रुग्णामध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागली. त्यातच त्याला मद्यपानाची सवय लागली आणि काही महिन्यांतच हे व्यसन गंभीर स्वरूप धारण करू लागले.

या मानसिक तणावाखाली त्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. सुदैवाने या दोन्ही प्रसंगी वेळीच मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. कुटुंबीयांनी वेळ न घालवता त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमा चांदूरकर, हिमांशू जाधव, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा यांनी त्याचे सखोल मूल्यांकन करण्यात आले आणि त्यानंतर ईसीटी, औषधोपचार, समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि व्यसनमुक्ती उपचारांचा समन्वय साधून एक सविस्तर उपचार योजना तयार करण्यात आली. उपचार प्रक्रियेमध्ये वैयक्तिक समुपदेशन, कुटुंबीयांचा सहभाग, गटचर्चा, योग व ध्यानधारणा या सर्वांचा प्रभावी वापर करण्यात आला. सातत्यपूर्ण उपचार व मानसिक आधारामुळे रुग्णाच्या मन:स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. आज रुग्ण पूर्णपणे व्यसनमुक्त असून, तो पुन्हा एकदा आपल्या कामात सक्रिय झाला आहे.
या यशस्वी उपचाराबद्दल बोलताना मानसोपचार विभागाचे प्रमुख म्हणाले, मानसिक आजार हा लपवून ठेवण्याचा विषय नसून, तो वेळीच लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले तर बरे होऊ शकतो.
– डॉ. ऋचिता आटे, निवासी डॉक्टर.









