जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवीन बसस्थानक परिसरात गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीचा मोबाईल चोरणाऱ्या भामट्याला जिल्हापेठ पोलिसांनी जेरबंद करून मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.

या कारवाईत हमीद अयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी पाचोरा येथील संपदा रविंद्र सोनवणे (वय २४) या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणी कॉलेजच्या कामानिमित्त जळगाव येथे आल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास जळगाव–चाळीसगाव बसमध्ये चढताना बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील मोबाईल फोन लांबविला.
या घटनेनंतर तरुणीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक भारती देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व नरेंद्र दिवेकर यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित हमीद अयुब खान यास ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने नवीन बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तरुणीचा चोरीस गेलेला मोबाईल तसेच अन्य दोन मोबाईल फोन असा एकूण तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
तरुणीचा मोबाईल चोरीस नेणारा आरोपी हाच असल्याची खात्री पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नवीन बसस्थानक परिसरात वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हापेठ पोलिसांकडून करण्यात आले आहे.









