जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाइल खराब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाची हत्या करणाऱ्या आणि दुसऱ्यावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नीलेश ऊर्फ बाळा प्रवीण पवार (वय २७, रा. कुसुंबे, ता. रावेर, ह. मु. रिंगरोड, जळगाव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. शिव कॉलनी स्टॉपसमोरील देशी दारूच्या दुकानासमोर २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी आरोपी नीलेश पवार, अमरसिंग चव्हाण व गणेश चव्हाण यांच्यात मोबाइल खराब केल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मृत अक्षय अजय चव्हाण (वय २३, रा. मढी चौक, पिंप्राळा) आणि त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव तेथे गेले होते. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना नीलेश याने अक्षय चव्हाण याच्या छातीवर व पोटावर धारदार चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
तसेच युवराज जाधव याच्याही पाठीवर वार करून तेथून पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी अक्षय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृताचा भाऊ शैलेश अजय चव्हाण याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नीलेश पवार याला हत्या प्रकरणांत जन्मठेप व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.









