बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शिरसोलीचा उपक्रम
शिरसोली ( वार्ताहर ) – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष वाचन लेखन प्रकल्प राबविण्यात आला.सदर प्रकल्प शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासून अखंडपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता विकसित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पातळीनुसार पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्गवारी करून मराठी वाचन, लेखन व गणितातील मूलभूत संकल्पना,इंग्रजी या विषयांच्या मूलभूत कौशल्यांवर भर देण्यात येत आहे.
सदर उपक्रम हा शाळा भरण्याच्या अगोदर दररोज 10:45 वाजता सुरू होतो. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका अतिरिक्त वेळ देऊन सदर वर्गासाठी मार्गदर्शन करतात. या उपक्रमामध्ये कृतिशील शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे.तसेच दररोज सातत्यपूर्ण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. सदरच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून अप्रगत विद्यार्थी मराठी वाचन करणे गणितीय क्रिया सोडवणे यासारख्या क्रिया करायला लागले. या उपक्रम अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट करून पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत सतत पालकांच्या घरी जावून भेटी घेणे, पालकांचे समुपदेशन करणे व सतत पालकांशी समन्वय साधून घरोघरी भेटी देऊन गृहपाठ व नियमित अभ्यास उपस्थितीवरही भर दिला जात आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व संस्थेचे संचालक व पालकांनी स्वागत केले असून आगामी कालावधीत सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.









