जळगावात पिप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा छापा
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीररीत्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिप्राळा हुडको परिसरात करण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३५ ते ४.०० वाजेच्या दरम्यान पिप्राळा हुडको परिसरातील संशयित आरोपींच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत भारत गॅस कंपनीचे भरलेले व रिकामे सिलेंडर, मोटार, पंप, वजन काटा आदी साहित्य जप्त करण्यात आले. छाप्यात भरलेले ४ घरगुती गॅस सिलेंडर, रिकामे ६ सिलेंडर, दोन मोटार पंप, दोन वजन काटे असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेकायदेशीररीत्या सिलेंडर साठवून विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उमेर जुबेर खान (वय १८) आणि अरबाज अब्बास शेख (दोघेही रा. पिप्राळा हुडको, जळगाव), यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोना अजय विनायक सपकाळे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि संजय तडवी करीत आहेत.









