खेळ, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा संगम, मनोरंजनातून मिळणार ज्ञानाचे दर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा एड्युफेअर सर्व नागरिकांसाठी खुला असणार आहे. या तीन दिवसीय उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ८० पेक्षा अधिक गेम झोन आणि विविध आकर्षक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य जिल्हावासीयांना अनुभवता येणार आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी “मुलांनी उद्योजक बनावे” या दूरदृष्टीतून वेगळी व नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील उद्योगशीलता, सर्जनशीलता, नवकल्पनाशक्ती विकसित व्हावी, याच उद्देशाने दरवर्षी एड्युफेअर या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा सलग तीन दिवस चालणाऱ्या या एड्युफेअरची संकल्पना ‘खेळता खेळता शिका आणि शिकता शिकता खेळा’ अशी आहे.
एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना चालना देणारे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमधील विविध खेळ आणि उपक्रम असणार आहेत. तसेच विज्ञान आणि गणित विषयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना देणारी मॉडेल्स व प्रयोग सादर केले जाणार आहेत. मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेतून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकला यांचा सुरेख मिलाफ एड्युफेअरमध्ये अनुभवता येणार आहे. यामध्ये पपेट शो, नृत्य, संगीत सादरीकरणे हीदेखील प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’
एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी उभारलेली खास ‘खाऊ गल्ली’ असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे उपलब्ध असतील. त्यामुळे जळगावकरांना विद्यार्थ्यांच्या कौशल्याबरोबरच विविध चवींचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
एड्युफेअरमध्ये असणारी प्रमुख आकर्षणे
जादूचे प्रयोग, खाऊ गल्ली, लँग्वेज झोन, ८० पेक्षा अधिक अद्वितीय खेळ, रणपा बैलगाडी सवारी, घमाल पपेट शो, संगीत-नृत्य सादरीकरणे, सायन्स झोन, रोमन संस्कृतीचे दर्शन, ६०० पेक्षा अधिक हस्तकला वस्तू, मॅथ झोन, आरश्यांची दुनिया, अॅडव्हेंचर झोन, टॅलेंट शोसह विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम एड्युफेअरचे वैशिष्ट्य असणार आहे.
एड्युफेअर–२०२५ चे भव्य उद्घाटन दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पकता आणि कौशल्य पाहण्यासाठी नागरिकांनी या एड्युफेअरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन आणि प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे.









