जळगावातील मेहरूण येथे संत ज्ञानेश्वर विद्यालयात उपक्रम
जळगाव( प्रतिनिधी ) – येथील मेहरूण परिसरातील संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिकदृष्ट्या इयत्ता पहिली व दुसरीच्या अप्रगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष कृती आराखडा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आराखड्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पातळीनुसार गटवारी करून वाचन, लेखन व गणित या मूलभूत कौशल्यांवर भर देण्यात येणार आहे. अतिरिक्त मार्गदर्शन तास, पुनरावृत्ती उपक्रम, कार्यपत्रिका, चित्र-आधारित अध्यापन,खेळ व कृतीशील शिक्षण पद्धतींचा वापर केला जाणार आहे. तसेच सातत्यपूर्ण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. या कृती आराखड्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शैक्षणिक गुणवत्ता उंचावेल.” शिक्षकवृंदाने पालकांशी समन्वय साधत घरगुती सराव व नियमित उपस्थितीवरही भर दिला आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी स्वागत केले असून, आगामी कालावधीत सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









