जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनने अवघ्या काही दिवसांतच एका महत्त्वपूर्ण चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत, मोटारसायकलच्या डिक्कीतून ८३,००० रुपये चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल (रोख रक्कम) जप्त केला आहे.
रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री आपली दुचाकी (ॲक्टिव्हा मोपेड) शेरा चौकातील भूमी हॉटेलजवळील एका मेडिकलसमोर लावली होती. दिवसभरात दुकानात जमा झालेले रोख ८३,००० रुपये त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ही संपूर्ण रक्कम लंपास केली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक त्वरित कामाला लागले. पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. या प्रयत्नांमधून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. १२ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरातील दत्त नगर परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये रुषीकेश अजय तेली (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव), रोहित गुरुदयाल बघेल (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव), अनुज ईश्वर सोनवणे (रा. दत्त नगर, मेहरुण, जळगाव) यांचा समावेश आहे. या तिघांकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम ८३,०००/- रुपये जप्त करण्यात आली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि राहुल तायडे आणि पोउपनि चंद्रकांत धनके यांच्यासह सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रमोद लाडवंजारी, पोकों नितीन ठाकुर, पोकों किरण पाटील, पोकॉ गणेश ठाकरे, पोकों राहुल घेटे आणि पोकॉ नरेंद्र मोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.









