अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांना संशय ?
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी १४ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास सागर साहेबराव सोनवणे (वय २७) या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला गंभीर जखमी अवस्थेत निमखेडी गावातील राममंदिराच्याजवळ फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मयत घोषित केले.मृत सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान हा खून कशातून झाला, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.









