घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय ‘चद्दर गँग’चा पर्दाफाश
तांत्रिक विश्लेषणावरुन माग काढत गँगमधील चोरटा जेरबंद; एलसीबीची कारवाई
जळगाव प्रतिनिधी अंगावर चादर पांघरुन घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय चद्दर गैंगच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या गँगमधील रमेश भुरुसिंग अनारे (वय २७, रा. स्कूल फलिया, गाव तुडा, ता. कुक्षी, धार, मध्यप्रदेश) याला मध्यप्रदेशातील अलीराजपूर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी चौकशी केली असता, जळगावात अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली.
शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना एलसीबीला दिला होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील यांचे पथक तयार करुन चोरट्यांच्या शोधार्थ रवाना केले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, त्यांना हे चोरटे बसने शिरपूरपर्यंत गेले. तेथून त्यांनी एका खासगी वाहनाने सेंधवार्यंत गेल्याचे पथकाला समजले.
एलसीबीच्या पथकाने संशयित चोरट्यांचा सेंधवापर्यंत माग काढला. यावेळी त्यांना सेंधवा बस स्थानकातून चोरटे धार जिल्ह्यातील बागताळणा येथे गेल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चद्दर गैंगमधील संशयित चोरट्यांचा निष्पन्न केले.
चद्दर गँगमधील संशयित चोरटे निष्पन्न होताच सापळा रचून पथकाने मध्यप्रदेशातील अलीराजपुर येथून संशयित रमेश भुरुसिंग अनारे याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने कुंद्या डावरीया (रा. पटोडा, मोरसिंगे, ता. कुक्षी, जि.धार), बरदान देवका (रा. गोराडीया, ता. कुक्षी, जि. धार), कालू डावरिया (रा. नरवारी, ता. कुक्षी, जि. धार), राहूल डावरिया (रा. भडकच्छ, ता. कुक्षी, जि. धार) व सुनिल परमाती (रा. गेटाबाग तांडा, सर्व रा. मध्यप्रदेश) या साथीदारांच्या मदतीने गोदावरी कॉलेज आणि कुसुंबा शिवारात घरफोडी केल्याची कबुली दिली.
अंगावर चादर ओढून अनवाणी पायाने करतात चोरी घरफोडी करणारी मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळी ही घरफोडी करतांना अंगावर चादर पांघरुन आणि अनवाणी पायाने चोरी करतात, चोरी केल्यानंतर ते सर्व अंगावरील साहित्य काही अंतरावर फेकून तेथून पसार होत असल्याने पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच ही टोळी चोरी करतांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करीत नसल्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना कठीण होत असल्याचे समोर आले आहे









