लोक अदालतीतून अपघातात पाय गमावलेल्या जखमीला २२ लाखांची नुकसान भरपाई
जळगाव प्रतिनिधी जामनेर–अमळनेर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाय गमावलेल्या संदीप नारायण वानखेडे (रा. शिरुड, ता. अमळनेर) यांना लोकअदालतीतून २२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने ही भरपाई देण्याचा आदेश लोक न्यायालयाने दिला.
दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी संदीप वानखेडे हे मित्रासोबत दुचाकीने अमळनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र. एमएच १९ झेड ८११५) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात संदीप वानखेडे व त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने दोघांना उपचारासाठी भुसावळ येथे दाखल केले.
अपघातात डंपरचे चाक संदीप वानखेडे यांच्या पायावरून गेल्याने गंभीर इजा झाली. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करून त्यांचा पाय काढावा लागला असून उपचारासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले. या प्रकरणी डंपर चालक अर्जुन श्रावण ठाकरे याच्याविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने संदीप वानखेडे यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत मोटार अपघात नुकसानभरपाई प्राधिकरणात अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांच्यामार्फत दावा दाखल केला. सुनावणीनंतर हा दावा दि. १३ डिसेंबर रोजी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आला.
अर्जदारातर्फे उपचार खर्च, अपंगत्वामुळे आयुष्यभर होणारे आर्थिक नुकसान याबाबत सविस्तर बाजू मांडण्यात आली. चर्चेनंतर विमा कंपनी व लोक न्यायालयाच्या पॅनलसमोर तडजोड होऊन २२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
दावा दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षात निकाल लागल्याने अर्जदार समाधान व्यक्त करीत आहे. अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी, अॅड. हेमंत जाधव, अॅड. सुनील चव्हाण व सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले. तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. रेखा कोचुरे यांनी बाजू मांडली.









