भाजपातर्फे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरगच्च नियोजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार असून, भारतीय जनता पार्टीने इतर पक्षांच्या तुलनेत यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा शुभारंभ सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून भारतीय जनता पार्टी, जिल्हा कार्यालय, (जी.एम.फाउंडेशन जळगाव) येथे होणार आहे.
राज्याचे भाजप नेते, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जिल्हा निवडणूक प्रभारी तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, निवडणूक प्रमुख आ. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखती मंडल व प्रभाग निहाय वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा संयोजक विशाल त्रिपाठी आणि सहसंयोजक नितीन इंगळे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की, सर्व मुलाखती सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी आणि दिलेल्या वेळेतच होतील, याची नोंद घ्यावी.









