सरपंच, शिपायावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील सरपंच आणि शिपाई यांनी तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मंगळवारी दिनांक ९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांना काकोडा येथे शासनाच्या योजनेतून घर बांधायचे आहे. त्यासाठी ते सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना भेटले. त्यावेळी कांबळे यांनी तक्रारदार यांना दि. ३० ऑक्टोबर रोजी काकोडा येथील ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक आठचा उतारा दिला.
सरपंच यांनी उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सरपंच कांबळे यांच्याविरोधात प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सरपंच कांबळे यांनी तक्रारदार यांच्या नावे काकोडा ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक आठचा उतारा तयार करून आणून दिला.
त्या मोबदल्यात ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकर यांनी पंचांच्या समक्ष ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच मागणी सरपंच कांबळे यांनी प्रोत्साहन दिल्याची खात्री झाली आहे. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशन येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई ही पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेश सिंग पाटील, अमोल सूर्यवंशी यांनी केली. तपास निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.









