अमळनेर तालुक्यातील जळोद रस्त्यावरील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – जावयाने सासूच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून तिला जखमी करून पळून गेल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी जळोद रस्त्यावर आर्मी स्कूल जवळ घडली. जावयाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिनाबाई समाधान कोळी (रा. अंबापिंप्री ता. पारोळा) या महिलेच्या मुलीचा विवाह १५ वर्षांपूर्वी विनोद विक्रम कोळी (रा. खंबाळे ता शिरपूर) याच्याशी झाला होता. तीन वर्षांपूर्वी तिच्या मुलीने आत्महत्या करून घेतली होती. तरीही जावई विनोद कोळी हा सासरवाडीला अंबापिंप्री येथे राहत होता. सहा महिन्यांपूर्वी जावयाने दुसरे लग्न केले तरी तो अंबापिंप्री येथेच राहत होता. चार महिन्यांपूर्वी विनोदची दुसरी पत्नी आणि मिनाबाई यांच्यात भांडण झाल्याने विनोद दुसऱ्या पत्नीसह बिडगाव ता. चोपडा येथे राहायला गेले होते.
मिनाबाईचा मुलगा भरत कोळी आणि जावई विनोद कोळी यांच्यात मिनाबाईच्या बदनामीवरून वाद झाला होता. विनोद याने २४ नोव्हेंबर रोजी सासू मिनाबाईला फोन करून आपल्याला वाद मिटवायचे आहेत. मला भेटायला या म्हणून पैलाड येथे बोलावले. मिनाबाई पैलाड येथे गेली असता विनोदने तिला मोटरसायकलवर बसवून जळोद रस्त्यावर आर्मी स्कूलच्या पुढे खदानीजवळ नेले. तेथे त्याने कुरापत काढून मिनाबाईच्या गालावर चापटांनी मारले आणि तिच्या कानातील ४० हजार रुपये किमतीच्या ८ ग्राम सोन्याच्या ८ बाह्या आणि १० हजार रुपये किमतीची गळ्यातील २ ग्राम वजनाची सोन्याची पोत असे ५० हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेले. मिनाबाई तेथे बेशुद्ध पडली होती.
नंतर मुलाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात व नन्तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. उपचार घेतल्यानन्तर तिने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विनोद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.









